समृद्धी महामार्ग विकासाचा की दरोडेखोरांच्या दहशतीचा? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर सवाल संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

समृद्धी महामार्ग विकासाचा की दरोडेखोरांच्या दहशतीचा? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर सवाल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या दरोडे, लुटमारीच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांवर अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला असून राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या दरोडे, लुटमारीच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांवर अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला असून राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

“मी स्वतः या महामार्गाने अनेकदा प्रवास केला आहे. प्रवासादरम्यान विविध ठिकाणी थांबलो असता नागरिक, प्रवासी आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी माझ्याकडे थेट तक्रारींचा पाढा वाचला. समृद्धी महामार्ग आता प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री दरोडेखोर सुसाट सुटले आहेत, मात्र शासनाचे याकडे लक्ष नाही,” अशा व्यथा नागरिकांनी माझ्याकडे बोलून दाखवल्या असल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

“समृद्धी महामार्गावर गुन्हेगारांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण व इशिंगपूर येथे दरोडेखोरांनी लोखंडी धारदार वस्तू फेकून वाहनांचे टायर पंक्चर केले, चालकांना मारहाण करून लाखांचा ऐवज लुटला. छत्रपती संभाजीनगरच्या व्यापाऱ्याचा पाठलाग करून, बंदूक व शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याची साखळी व रोकड लुटण्यात आली. ट्रकमधून ५०० लिटर डिझेल चोरी, कोट्यवधी रुपयांच्या लशींची ट्रकमधून पळवापळवी, तसेच सराफा व्यापाऱ्यांचे सोने पळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत,” असेही ते म्हणाले.

गुन्हे कुठे आणि कोणत्या पद्धतीने घडतात, याचे तत्काळ मॅपिंग करून रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष पोलीस गस्त वाढवण्यात यावी. आपत्कालीन यंत्रणा आणि महामार्ग पोलीस प्रतिसाद वेळ सक्षम करण्यात यावा. महामार्गावरील प्रत्येक संवेदनशील टप्प्यापर्यंत सीसीटीव्ही जाळे पोहोचवून संशयित वाहनांवर तातडीने लक्ष ठेवले जावे. आंतरजिल्हा व आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

असे लुटणारे रस्ते नकोत!

महाराष्ट्राने मोठ्या अपेक्षेने समृद्धी महामार्गाकडे बघितले होते. जलद दळणवळणासाठी रस्ते असावेत, पण लुटणारे रस्ते नको! परंतु आज या महामार्गावर अपघातांसोबतच दरोडेखोरांची ‘काळी सावली’ पसरली आहे. टोलनाके, सीसीटीव्ही आणि महामार्ग पोलिसांचे जाळे असतानाही दरोडेखोर येतात कुठून आणि लुटून जातात कुठे? स्थानिक गुन्हेगारांना महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती कशी मिळते? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आवाज बंद कर डीजे, तुला ‘बाप्पा’ची शपथ हाय...; मुंबईकरांनीही दिली 'डीजे'च्या दणदणाटाविरोधात हाक, गणेशोत्सव मंडळेही सरसावली

Mumbai : एआय गॉगल्स, चष्म्यामुळे छुप्या रेकॉर्डिंगचा धोका; पालिका कार्यालयात तातडीने बंदी घाला - सचिन पडवळ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार सुगंधी दूध; येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यभर पुरवठा

Mumbai : बाप्पाच्या आगमनावेळी चपलांचा ढीग; लालबाग, परळमध्ये सापडलेल्या चार मेट्रिक टन चपलांचा पुनर्वापर

पोलिसांकडूनच अमली पदार्थांची विक्री; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आरोप, २०२९ पर्यंत समूळ उच्चाटनाचा निर्धार