हारुन शेख / लासलगाव
दारिद्र्यरेषेखालील गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेतील साखर वितरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पिंपळगावनजीक वाकी रस्त्यावरील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी आलेल्या ४०० ते ५०० किलो वजनाच्या साखरेच्या पाकिटांमधील साखर रिकामी करून ती विक्रीसाठी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गोरगरीब लाभार्थ्यांच्या हक्काच्या साखरेवरच डल्ला मारला जात असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते. मात्र, संबंधित स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांसाठी आलेल्या साखरेच्या पाकिटांमधील साखर काढून तिची परस्पर विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच संबंधित दुकानाचा परवाना रद्द करून शासनाच्या नियमानुसार पात्र व जबाबदार वितरकाकडे धान्य वितरणाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
याशिवाय या कथित गैरव्यवहारात पुरवठा विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. साखरेचा प्रत्यक्ष साठा, वितरण नोंदी, लाभार्थ्यांच्या पावत्या आणि संबंधित व्यवहारांची तपासणी केल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येऊ शकते. त्यामुळे पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याची पळवापळवी थांबवा !
"शासन गोरगरीब कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळावे आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने विविध योजना राबविते. मात्र, अशा योजनांमधील धान्याचा काळाबाजार होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी साखर त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचली पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी दुकानदारांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी."धनंजय वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळगाव (नजीक)