मुंबई : महिला सक्षमीकरणसह त्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी आता राज्यातील महामार्गावर महिला बचत गटांना उत्पादन विक्रीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच महामार्गावरील प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांची देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
चौथ्या महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दूरवस्था दूर करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले होते. प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित केले होते, असे तटकरे म्हणाल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार काम
स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून, जनसुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.