जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गुरुवारी झालेल्या जळगाव दौऱ्यातील जिल्हा बैठकीस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे गुजराथींच्या गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
२०१० मध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सात आमदार, दोन मंत्री आणि सहकारी संस्थांवर ठाम वर्चस्व होते. मात्र अलीकडील निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेतली. आतापर्यंत सर्व बैठकांना उपस्थित राहणारे गुजराथी या वेळी अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले. शिंदेंनी भाषणात “काही जण पक्ष सोडून गेले असून अजून काही जाण्याची शक्यता आहे,” असे वक्तव्य केले, ज्याचा रोख गुजराथींकडे असावा, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गुजराथींचा चोपडा मतदारसंघ अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. चोपडा बँक व नगरपालिका यावर त्यांचे वर्चस्व आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये या वर्चस्वाला धक्का बसू नये, म्हणून त्यांना निर्णय घ्यावा लागेल, अशी चर्चा चोपड्यात सुरू आहे.
मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि राहणार आहे. मात्र लवकरच राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करीत आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा ओढा अजित पवार गटाकडे आहे आणि त्यांना एकटे सोडता येणार नाही, म्हणून सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.अरुण गुजराथी