सोलापूर : "अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर" अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यामुळे सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले आहे. भाविकांच्या दाटीमुळे पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पहाटे होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
पंढरपुरात आषाढी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते. त्यामुळे या यात्रेनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मुख्यमंत्री शनिवारी मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाले. सोलापुरातून हेलिकॉप्टरने ते पंढरपूरकडे रवाना झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या मजल दरमजल करत लाखो भाविकांसह शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाल्या आहेत.