पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, लाखो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विभाग आणि नगरपरिषदेच्या विविध यंत्रणांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. वारीच्या काळात आरोग्य, पाणी, वीज, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या अत्यावश्यक सेवा वारकऱ्यांना विनाव्यत्यय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी आपापली कामे ३० जूनपूर्वी शंभर टक्के पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
नगरपरिषदेच्या वतीने या सोहळ्यासाठी १७ अधिकारी, २०० कर्मचारी आणि १५० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात १,८०० मोबाइल शौचालये आणि ६०० सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच २० सक्शन मशिन्स, १० घंटागाड्या, पाच ट्रॅक्टर आणि तीन कॉम्पॅक्टरच्या साहाय्याने शहर स्वच्छ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ जुलैपासून संपूर्ण शहरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात येणार असून, गर्दीच्या ठिकाणी असलेल्या रोहित्रांना विशेष संरक्षण व्यवस्था देण्यात येणार आहे. बैठकीत स्थानिक नगराध्यक्ष आणि यात्रा समितीच्या वतीने महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष 'पिंक टॉयलेट्स'ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच चाकण फाटा ते आळंदी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देणे आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव आहे. लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.अनिल दौंडे, उपविभागीय अधिकारी, खेड
दुहेरी वीजवाहिनीची व्यवस्था
नदीघाट परिसरात सातत्याने जंतुनाशक फवारणी केली जाणार असून, १५ पाण्याच्या टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहर आणि परिसरात १९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण आळंदी पोलीस ठाण्यातून केले जाणार आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दोन स्वतंत्र उपकेंद्रांद्वारे दुहेरी वीजवाहिनीची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचे विशेष रुग्णालय, पाच ऑक्सिजन बेड तसेच पाच अत्याधुनिक रुग्णवाहिका २४ तास मोफत सेवेसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
बैलजोडी निवडीचा वाद पेटला
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी रथाला जुंपल्या जाणाऱ्या बैलजोडीच्या निवडीवरून निर्माण झालेला अंतर्गत वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. रथाला बैलजोडी लावण्याच्या परंपरेवरून आळंदीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून, बैल निवड समितीने या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सन १९८२ सालापासून माऊलींच्या रथास बैलजोडी लावण्याची संपूर्ण जबाबदारी समितीकडे सोपवण्यात आली आहे. यावर्षी परिवारातील अंतर्गत मतभेद न मिटल्याने बैलजोडी निवडीचा प्रश्न रेंगाळला आहे.
समितीच्या चौकशीनुसार उमेश यांच्याकडे स्वतःची बैलजोडी नसून त्यांनी भाड्याने बैल आणल्याचे समोर आले आहे. काही स्थानिक व्यक्ती राजकीय हेतूने त्यांना चिथावणी देत असल्याचे सांगत समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.