देहू : आषाढी एकादशी जवळ येऊ लागताच वारकऱ्यांना वेध लागतात ते वारीचे. टाळ-मृदुंगाच्या गजरात तुकाराम, ज्ञानोबा माऊलीच्या नावाचा गजर करत लाखो वारकरी पंढरीच्या वारीस निघतात. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी पंढरपूराकडे प्रस्थान ठेवले. हा वैष्णवांचा मेळा भक्तीसागराच्या रुपात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
पाऊसधारा सुरू झालेल्या असतानाच भक्तpभावात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना ओढ आहे ती विठुरायाच्या भेटीची. वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुतारी, टाळ, मृदुंगाचा निनाद, वीणेचा झंकार करीत वारकरी मुक्तपणे देहभान हरपून विठुरायाच्या नावाचा गजर करीत, फुगड्या खेळत आनंद व्यक्त करीत होते.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, ज्येष्ठ वारकरी व पंढरीनाथ महाराज तावरे यांच्या हस्ते झाली. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह “ज्ञानोबा- तुकाराम” हा जयघोष केला व हा पालखी सोहळा पंढरीच्या वाटेला लागला. मृदंग, टाळ, वीणा यांचा निनाद सर्वत्र गुंजला आणि सार देऊळवाडा परिसर दमाणून गेला. या वातावरणात पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली.
पालखी, पादुकांची विधिवत पूजा
प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी इनामदार वाड्यात आणण्यात आली. दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. ही पूजा उरकल्यानंतर पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर आणि इनामदार वाड्यातून पादुका मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या.
म्हातारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर, भक्तीमय वातावरणात वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आल्या. येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून त्या भजनी मंडपात आणण्यात आल्या. या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी महाद्वारातून मंदिराच्या आवारात येऊन भजन म्हणत आपला क्षीण घालवला.
इंद्रायणी नदीकाठ वारकऱ्यांनी फुलला
देहू येथील मुख्य मंदिर, वैंकुठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी नदीकाठ पहाटेपासूनच वारकऱ्यांनी फुललेला होता. पहाटेपासून इंद्रायणी नदीकाठी आंघोळ करून भाविक दर्शनासाठी जात होते.