अशोक खरातकडील गुंगीच्या औषधाचे धागेदोरे शोधणार; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी 
महाराष्ट्र

अशोक खरातकडील गुंगीच्या औषधाचे धागेदोरे शोधणार; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांना गुंगीचे औषध देऊन शोषण केल्याच्या प्रकरणात तो औषधात नेमके काय मिसळायचा, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.

Swapnil S

नाशिक : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची (१८ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात याने महिलांना दिलेल्या गुंगीच्या औषधाचा तपास पोलिसांना करायचा आहे. यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.

कोर्टात आजची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. पण सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे सुनावणी काही काळ थांबवण्यात आली होती. सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी गुन्ह्याची भीषणता मांडली. आरोपी खरात स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून महिलांना जाळ्यात ओढत होता. तो महिलांना गुंगीचे औषध प्यायला द्यायचा आणि लैंगित शोषण करायचा. खरात गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळायचा याची माहिती पोलिसांना घ्यायची आहे, त्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले.

खरातच्या वकीलांचा कोठडीला विरोध

यावेळी खरातच्या वकीलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झाला असल्याचा दावा त्यांनी केली. त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नसल्याचे वकील सचिन भाटे यांनी सांगितले. . मात्र, सरकारी पक्षाने हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असून तपास महत्त्वाचा असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी मंजूर केली.

‘एसआयटी’च्या तपासाला वेग

अशोक खरातवर आतापर्यंत अनेक महिलांनी अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक विधवा आणि विवाहित महिलांना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. आता नवीन गुन्ह्यात मिळालेल्या ५ दिवसांच्या कोठडीत खरातच्या 'मोडस ऑपरेंडी'चे आणखी काही धक्कादायक पैलू समोर येण्याची शक्यता आहे.

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन