नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलीस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, आता रविवार, १९ एप्रिल 'एसआयटी'ने त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला आता गुरुवार, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलीस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे.
'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे सुनावणी
अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे,’ असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
खरातचे डोके दुखतेय, पेनकिलरचाही फायदा नाही
दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तपासातील धक्कादायक बाबी :
पत्नी अद्याप फरार : खरातची पत्नी कल्पना ही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रिमोट कंट्रोलचा साप : भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खरात २० फुटांचा एक बनावट नाग 'रिमोट कंट्रोल'ने फिरवत असे. या 'चमत्कारा'ला नागरिक दैवी शक्ती मानून घाबरत होते.
बनावट चमत्कार : दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसारख्या वस्तूंचा वापर करून तो चमत्काराचा बनाव करायचा.
गुंगीच्या द्रव्याचा वापर : पीडित महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा गुंगी येण्यासाठी तो विशिष्ट औषधांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
ब्लॅकमेलिंगचे रॅकेट : फसवणूक आणि अत्याचारासोबतच खंडणी उकळण्याचे मोठे रॅकेट तो चालवत होता.