महाराष्ट्र

कोविड घोटाळ्यातील आरोपींची १२.२४ कोटींची मालमत्ता जप्त ;ईडीची कारवाई

पाटकर यांच्या मालकीचा २.८ कोटींचा फ्लॅट, सहआरोपी राजीव साळुंखे यांच्या नावावरील फ्लॅट व सोनू बजाज यांचा फ्लॅट जप्त केला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आरोपींची १२.२४ कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सुजित पाटकर यांच्यासह अन्य आरोपींचे तीन फ्लॅट‌्स, म्युच्युअल फंड युनिट‌्स‌ व बँकेतील शिल्लक रक्कम जप्त केली.

पाटकर यांच्या मालकीचा २.८ कोटींचा फ्लॅट, सहआरोपी राजीव साळुंखे यांच्या नावावरील फ्लॅट व सोनू बजाज यांचा फ्लॅट जप्त केला. तसेच डॉ. हेमंत गुप्ता यांचे २.७ कोटींचे म्युच्युअल फंड व बँकेतील शिल्लक ३३.९ लाख रुपये जप्त केले. संजय शहा यांच्या बँक खात्यातील ३ कोटी रुपये जप्त केले.

पीएमएलए कोर्टात जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सुजित पाटकर याच्यासह हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे, अरविंद सिंह, डॉ. किशोर बिसुरे यांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार, काळा पैसाविषयक गैरव्यवहार आदी बाबींचा समावेश आरोपपत्रात आहे.

लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा भागीदार या नात्याने पाटकरने सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी अनेक गैरकृत्ये केली. रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. त्याने बनावट हजेरीचे रेकॉर्ड‌्स‌, योग्य रेकॉर्ड न ठेवता इन्व्हाईस बनवले, बिले मंजूर करायला मनपा अधिकाऱ्यांना लाच देणे आदी प्रकार केले.

नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून (एकूण ३२.५ कोटी रुपये) लक्षणीय रक्कम त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात (२.८१ कोटी) वळवण्यात आली, कथितपणे वैयक्तिक कर्ज आणि इतर खर्चाची परतफेड करण्यासाठी वापरली गेली.

दहिसर जम्बो सेंटरचे अधिष्ठाता म्हणून काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांच्यावरही आरोप ठेवले. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी त्यांची जबाबदारी पेलली नाही. तसेच लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसने हजेरीचे खोटे रेकॉर्ड दाखवून बनावट बिले पास करून घेतली. डॉ. हेमंत गुप्ता यांनी वैयक्तिक फायद्यासाठी बनावट हजेरीचे रेकॉर्ड‌्स‌ बनवले. त्यासाठी बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यांनी या गुन्ह्यातून मिळालेले पैसे स्वत:च्या बँक खात्यात वळवले. तसेच हे पैसे त्याने म्युच्युअल फंडात गुंतवले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा आणखी एक भागीदार संजय शहा याची या कंपनीत २० टक्के मालकी होती. हा घोटाळा करण्यात त्याचा महत्त्वाचा भाग होता.

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

"माझे काका....कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून..."; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

मुंबईत CNG चा पुरवठा थांबण्याची शक्यता; वडाळा येथे महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये बिघाड

सरनाईकांना रोखायला वनमंत्री नाईक मैदानात; मीरा-भाईंदरमध्ये भाजपला बळ देण्याचा प्रयत्न