छत्रपती संभाजीनगर/जळगाव/नांदेड : शेतकऱ्याच्या जीवनात बैल म्हणजे केवळ जनावर नव्हे, तर सुख-दुःखाचा सोबती आणि काळ्या मातीत घाम गाळणारा जिवाभावाचा साथीदार. या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक बैलपोळा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ग्रामीण भागातील मातीशी जोडलेली ही परंपरा शहरातही तितक्याच आपुलकीने जपली जात असल्याचे चित्र दिसून आले.
बैलपोळ्याच्या निमित्ताने सकाळपासूनच घराघरांत लगबग सुरू झाली. अंगण सारवून, रांगोळ्या काढून तसेच पारंपरिक पदार्थांची तयारी करून महिलांनी सणाची जय्यत तयारी केली. बाजारपेठांमध्ये बैलांच्या सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी झूल, शिंगांचे रंग, गोंडे, नवीन वेसण आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
मातीशी नाते सांगणाऱ्या या सणाला भावनेची किनार लाभली आहे. प्रत्यक्ष बैल नसलेल्या अनेक कुटुंबांनीही मातीच्या बैलांची पूजा करून वाडवडिलांची परंपरा जपली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पूजेत सहभागी होत संस्कृतीची नाळ पुढच्या पिढीशी जोडली.
“शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांच्या अंगावर आज प्रेमाने रंग चढवला जातो. त्यांच्या शिंगांना रंग, अंगावर आकर्षक झूल आणि गळ्यात घुंगरू बांधून पूजा केली जाते. शेतकऱ्याच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या या मुक्या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे,” अशी भावना शेतकरी बांधव अरविंद भितकर आणि प्रफुल्ल भितकर यांनी व्यक्त केली.
उमर्डा, बाभुळगाव आणि चिकलठाणा परिसरातही पोळा सणाची लगबग सुरू होती. पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.
मारुती मंदिरात पूजन केल्यानंतर बैलांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली. पोळा म्हणजे केवळ सण नाही, तर शेतकरी आणि त्याच्या सर्जा-राजामधील अतूट नात्याचा उत्सव आहे. यंत्रांनी बैलांची जागा घेतली असली, तरी या मुक्या जीवाबद्दलची कृतज्ञता आणि मातीशी जोडलेली भावना आजही कायम आहे.
ट्रॅक्टरने घेतली शेतीत आघाडी
शेतीच्या कामात शेतकऱ्याची साथ देणाऱ्या बैलजोडीचे महत्त्व यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बैलजोडीऐवजी मातीच्या बैलांची पूजा केली जात आहे. मातीच्या बैलजोडीची किंमतही आता सुमारे १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील ट्रॅक्टरची संख्या २५.९३ लाखांवर पोहोचली असून, एका वर्षात त्यात २७.७ टक्क्यांची वाढ झाली होती. ट्रॅक्टरची संख्या वाढल्याने त्यावरील कर्जाचे प्रमाणही वाढले. प२०१२ आणि २०१९ या दोन पशुगणनांदरम्यान राज्यातील बैलांच्या संख्येत तब्बल २६ लाख ७ हजार ९२० इतकी घट झाली आहे.
पारंपरिक म्हणी व ओव्या
चक चाडा, बैल गाडा,
बैल गेला हो पोंगाडा...
पोग्याच्या ड्याची आणली माती,
त्याचा घडविला नंदी;
तो नेला हो भर पोळ्यामधी.
एक नमघडा पार्वती,
हरभरा, हरभरा महादेव...
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष; आदिवासी नृत्य, मल्लखांबची प्रात्यक्षिके
जळगाव : आदिवासी बांधवांचे पारंपरिक होळी नृत्य, मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके, सालदार मंडळींचे उत्स्फूर्त पावरी नृत्य, अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना आणि वृषभराजांची भव्य सवाद्य मिरवणूक अशा विविध उपक्रमांनी कृषीसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला पोळा सण जैन हिल्स येथे उत्साहात साजरा झाला.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्याची परंपरा सुरू केली. आधुनिकतेचा स्वीकार करताना नव्या पिढीचे भारतीय कृषीपरंपरा आणि संस्कृतीशी नाते दृढ राहावे, तसेच त्यांना कृषीसंस्कृतीतील बैलांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी बैलांना रंगीबेरंगी सजावट, आकर्षक झूल आणि पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वृषभराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. विजय माहेश्वरी, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून पोळा उत्सवाची सुरुवात झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगल परिसरातून आलेल्या ३५ आदिवासी बांधवांच्या समूहाने सादर केलेल्या पारंपरिक होळी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक वेशभूषेतील या नृत्यातून आदिवासी लोकसंस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले.
जैन इरिगेशनच्या कृषी विभागातील सालदार मंडळींचा यावेळी सपत्नीक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेतून पोळा फोडणाऱ्या सालदारांना रोख पारितोषिक देण्याची परंपरा सुरू आहे. यंदा २० हजार रुपयांची रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, अशोक जैन, अतुल जैन, प्रकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
चिखली येथे बैलपोळा सण उत्साहात
नांदेड : विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या चिखली (ता. कंधार) या गावी पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बैलांची सजावट करून त्यांचे पूजन करण्यात आले. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करत कृषीसंस्कृतीची परंपरा जपली.
या सोहळ्यास ललिता सुभाषराव पाटील-चिखलीकर, प्रतिभा प्रतापराव पाटील-चिखलीकर, ॲड. संदीप पाटील-चिखलीकर, डॉ. प्रमोद पाटील-चिखलीकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रवीण पाटील-चिखलीकर, सचिन पाटील-चिखलीकर, सरपंच साहेबराव पोटफोडे, महाजन पाटील, नामदेव पवळे, मोहनराव पवळे, ज्ञानेश्वर पवळे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोळा सणानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्याच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांना सजवून त्यांचे पूजन केले जाते.