पुणे : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बजाज पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ स्पर्धेदरम्यान मुळशी–कोळवण रस्त्यावर भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले, तर ५ ते ६ खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा कोळवण रोडवरून जात असताना हा अपघात घडला. एका ठिकाणी रस्त्याची रुंदी अचानक कमी होत असल्याची पूर्वसूचना नसल्याने सायकलपटूंना त्याचा अंदाज आला नाही. त्याचवेळी सायकलपटूंचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर इतका प्रचंड होता. अतिवेग आणि तीव्र वळणामुळे आघाडीवर असलेल्या एका सायकलपटूचे नियंत्रण सुटले आणि मागून येणारे खेळाडू एकामागोमाग एक एकमेकांवर आदळत गेले.
या साखळी अपघातात अनेक सायकलपटू सायकलवरून उडून थेट ट्रॅकच्या बाहेर फेकले गेले. जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे १५ मिनिटांसाठी शर्यत थांबवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा स्पर्धा सुरू करण्यात आली. ही शर्यत जिओ हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित करण्यात येत होती.
आंतरराष्ट्रीय दर्जावर प्रश्नचिन्ह
या अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि आयोजकांच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करताना मार्गावरील भौगोलिक परिस्थिती, रस्त्यांची रुंदी, तीव्र वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा सखोल अभ्यास का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कोळवण रोडवरील अरुंद भागाबाबत सायकलपटूंना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तसेच वळणाच्या ठिकाणी आवश्यक असलेले बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सायकलपटू घसरल्याने अपघाताला निमंत्रण
हिंजवडी येथून पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर स्पर्धेला सुरुवात झाली होती. मुळशी–कोळवण रस्त्यावर एका सायकलपटूचा तोल गेल्याने तो घसरला आणि त्यामागून वेगात येणाऱ्या सायकलपटूंचा जथ्था एकमेकांवर आदळला, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आकुर्डी येथील फिनिश पॉईंटजवळ एका सायकलपटूचा किरकोळ अपघात झाल्याची नोंद आहे.