सिंधुदुर्ग नगरी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर परिसरातील २१४ एकर जमीन संपादित करण्यात घेणार असून यामुळे शेतकरी व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी बांद्याचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर आणि ग्रामदैवत श्री भूमिका देवी या मंदिरांमध्ये सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
प्रस्तावित महामार्गामुळे इथली सुपीक शेती, बागायती, घरे व्यावसायिक आस्थापने तसेच स्थानिक रहिवाशांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या आराखड्यात शहरातील ब्राह्मण देवळाचाही समावेश आहे त्यामुळे स्थानिकांचे भावना दुखावल्या आहेत. तेव्हा सरकारने स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी आगरी मागणी करण्यात आली आहे
या नियोजित महामार्गाला विरोध करणाऱ्या एकूण ११२ हरकती बांदा परिसरातून प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींमध्ये मध्ये जमिनीचे होणारे नुकसान संभाव्य विस्थापन पर्यावरणावर होणारे परिणाम तसेच शेती आणि व्यापारावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या सामूहिक गाऱ्हाण्याच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली बांदा परिसराचा विकास नव्हे तर विनाश होणार आहे, अशी भावना व्यक्त केली. स्थानिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या याचा विचार करून प्रस्तावित आराखड्यात बदल करावा अशी मागणी करण्यात आलं असून हे मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बांदा शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या हरकती लक्षात घेऊन राज्य सरकारला या प्रश्नावर फेर विचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. या गाऱ्हाण्याच्या वेळी सरपंच प्रियांका नाईक उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष राजाराम (बाळू) सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद ख तीब अरुण मौर्ये गजानन गायतोंडे, मकरंद मोर्ये, समीर सावंत यांच्यासह प्रकल्प बाधित शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गावांतील जमीन जाणार
बांदा शहर आणि परिसरासोबतच डेगवे -१०२ एकर, पडवे-माजगाव-४३ एकर,पडवे -३० एकर, असनीये ४५ एकर, दाभिल-२७ एकर, घारपी-८ एकर, फणसवडे- १४० एकर, उंडेली-६० एकर,झोळंबे-७० एकर, फुकेरी-४५ एकर, कुंभवडे-६५ एकर, आदी गावांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात येणार आहेत.