आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण... 
महाराष्ट्र

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...

पुण्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने पोलिस बंदोबस्तात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने शनिवारी (दि. २७) कडेकोट पोलिस बंदोबस्तात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने प्रभाग क्रमांक २४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. मात्र अर्ज अपूर्ण असल्याने तो स्वीकारण्यात आला नाही.

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना सशर्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे.

घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश

न्यायालयाच्या अटी असतानाही बंडू आंदेकरने हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड घालून घोषणाबाजी करत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रवेश केला. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय’, ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत’, ‘मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही’, ‘वनराज आंदेकर जिंदाबाद’ अशा घोषणा देत त्याने अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला.

अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत

बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे तिघेही शनिवारी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र अर्ज अर्धवट भरलेला असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून, या कालावधीत बंडू आंदेकर पुन्हा अर्ज दाखल करू शकतो, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली. सोमवारी (ता. २९) पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे.

कोमकर कुटुंबीयांची भूमिका

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयुष कोमकर यांच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आंदेकर कुटुंबीयांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी भावनिक विनंती केली. “जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कृपया त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका,” असे त्यांनी सांगितले. तसेच, ज्या पक्षाने आंदेकरांना तिकीट दिले, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आंदेकर कुटुंबातील तिघे निवडणूक रिंगणात?

विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे तिघेही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या ५ कोटी ४० लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात सध्या कारागृहात आहेत. प्रचार करताना त्यांना न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा

दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोघींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधून आंदेकर कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. मात्र बंडू आंदेकरला पक्षाची उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

जीवनरक्षक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा 'ग्रीन कॉरिडॉर!' मुंबईतील डॉक्टरांची १७ मिनिटांतील किमया...

IIT-बॉम्बेच्या निवृत्त प्राध्यापकाची ६ कोटींची फसवणूक; सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, केअरटेकर महिलेचा जामीन मंजूर

पोटच्या मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; जवळा मुरार येथील घटनेचा उलगडा