Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार 
महाराष्ट्र

Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; आता रिंगणात २३ उमेदवार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणी काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Swapnil S

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणी काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोरे यांच्यासहित २४ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता रिंगणात २३ उमेदवार बाकी आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केरळचे निरीक्षक चन्नीथला यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या आदेशानुसारच बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सपकाळ यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते आणि पवार कुटुंबातील सदस्यांकडून सातत्याने विनंती केली जात होती. रोहित पवार यांनी सकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही फोनवरून काँग्रेसने माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्वतः फोनवरून संपर्क साधून आणि दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य मागितले होते, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे म्हणाले की, "एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचे पालन करत आहे. कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असताना युद्धातून मध्येच थांबणे कठीण असते, परंतु पक्षहितासाठी मी हा निर्णय घेतला आहे’. मोरे यांनी यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या महादेव जानकर आणि सातत्याने संपर्कात राहून पाठबळ देणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानले.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

Ganeshotsav 2026 : 'मुंबईचा राजा' चा यंदा अनोखा विसर्जन सोहळा; २२ फुटांचा गणराया जहाजाने खोल समुद्रात जाणार

Pune : गणपती विसर्जनासाठी वाहतूकीत मोठे बदल; ४८ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी, १७ प्रमुख रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण