Baramati By-Election : 'गुलाल नको, मिरवणुका नको'; विजय निश्चित होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट (Photo-X)
महाराष्ट्र

Baramati By-Election : 'गुलाल नको, मिरवणुका नको'; विजय निश्चित होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत बारामतीकरांचे आभार मानले. "दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून...

किशोरी घायवट-उबाळे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडी मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि.४) कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले. "विजयाचा आनंद साजरा करताना मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये आणि शांततेत निकाल स्वीकारावा," असे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत बारामतीकरांचे आभार मानले. हा जनादेश अजित पवार यांच्या स्मृतीला समर्पित असल्याचे त्यांनी म्हटले. "आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

'हा शेवट नाही, नव्या प्रवासाची सुरुवात'

सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील जनतेने दिलेला कौल हा केवळ विजय नसून जबाबदारी असल्याचे म्हटले. अजित पवार यांनी पाहिलेल्या बारामतीच्या विकासस्वप्नाला पूर्ण करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!" असे म्हणत त्यांनी पुढील वाटचालीचा निर्धार व्यक्त केला.

मतमोजणीत मोठी आघाडी

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नऊ फेऱ्यांनंतर सुनेत्रा पवार यांनी ७८ हजारांहून अधिक मते मिळवत भक्कम आघाडी घेतली आहे. त्यांच्या आघाडीमुळे बारामतीतील निकाल जवळपास एकतर्फी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळी ८ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक

यावर्षी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर बारामतीत ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि विरोधकांकडून प्रभावी आव्हान नसल्याने ही लढत सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांच्या बाजूने झुकलेली दिसत होती.

बारामतीत पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम

सुनेत्रा पवार यांच्या मोठ्या आघाडीमुळे बारामतीतील पवार कुटुंबाचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निकालाकडे केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद