महाराष्ट्र

धनंजय मुंडेंची पक्षाकडून पाठराखण; राजीनाम्याविषयी NCP ने स्पष्ट केली भूमिका

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली आहे.

Krantee V. Kale

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर निवेदन जाहीर केलंय. 'देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र, नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला', असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

"मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरुन आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच नैतिक मुद्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे - न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत", असे सुनील तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच (दि.१) जवळपास ८० दिवसांनी न्यायालयात १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड हाच देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.   

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल