मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हा ऐतिहासिक निकाल आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीन गॅस सिलिंडर, शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा मोबदला, शेतकऱ्यांना वीज बिल माफी अशा विविध योजना महायुती सरकारने जाहीर केल्या आणि अंमलबजावणीही केली. महायुतीने राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले आणि जनतेने मतपेटीतून महायुतीला पोचपावती दिली आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या मविआला लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला.
दरम्यान, घरात बसून सरकार चालवता येत नाही, असा टोला लगावत न्यायालयात न्याय मागणाऱ्यांचा जनतेने करेक्ट कार्यक्रम केला, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘वर्षा’ बंगल्यावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आणि मविआचा सुपडासाफ झाला. महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून भविष्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा असा विजय होणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.
निवडणूक लोकांनी हातात घेतली. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रोची कामे पूर्ण केल्याने वेगवान प्रवास सुरू झाला. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या राज्याला पुढे नेण्यासोबत सर्वांगिण विकास करायचा हे आमचे ध्येय होते. लोकांनी द्वेषाचे, आरोपांचे राजकारण धुडकावून लावले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना कोणाची हा निर्णय जनतेच्या न्यायालयात जाऊन घेणार, असा घोष काहींनी लावला होता. परंतु, जनतेने आता स्पष्टपणे कौल दिला आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘एक हैं, तो सेफ है’ जनतेने स्वीकारले - फडणवीस
विधानसभा निवडणुकीत महायुती तोंडावर आपटणार, एकनाथ शिंदे यांचे काय होणार, अशी टीका मविआचे नेते करत होते. मात्र, महायुतीच्या कामांना जनतेने प्राधान्य दिले. मतदारांचा आभारी असून महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहोत. महाराष्ट्राने दाखवलेल्या विश्वासामुळे भविष्यात खूप काम करावे लागेल. मतदारांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
झारखंडमध्ये अतिशय कमी फरकाने झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय झाला, म्हणजे तिथले ईव्हीएम चांगले होते. परंतु, महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणजे इथले ईव्हीएम खराब होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतो, इथे लोकशाहीचा खून झाला आहे, अशी टीका होते. संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करावे. जे आत्मचिंतन करत नाहीत, ते संपून जातात, असे फडणवीस म्हणाले.
आमची टिंगलटवाळी केली - अजित पवार
मतदारराजाने प्रचंड अशा प्रकारचे यश प्राप्त करून दिले. त्यासाठी महायुतीकडून तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत मतदारांना अभिवादन केले. तसेच राजकारणात आल्यापासून महाराष्ट्रात कधीही कोणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेले मी पाहिलेले नाही. विरोधकांकडून आमची सातत्याने टिंगलटवाळी करण्यात आली. तरीही महायुतीच्या विकास कामाकडे बघून मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही हुरळून जाणार नाही, आमच्यावर आता जबाबदारी वाढल्याचे पवार म्हणाले. लोकसभेत मोठे अपयश मिळाले. आम्ही तो निकाल मान्य करून त्यातून त्यानंतर सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यशही आले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा महानिकाल २०२४
महायुती
भाजप १३३
शिवसेना (शिंदे) ५७
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ४१
जनसुराज्य पक्ष २
आरएसव्हीए १
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष १
मविआ
शिवसेना (उबाठा) २०
काँग्रेस १६
राष्ट्रवादी (शरद पवार) १०
समाजवादी पक्ष २
सीपीआय (एम) १
पीडब्ल्यूपीआय १
हे दिग्गज जिंकले
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
धनंजय मुंडे
नाना पटोले
राधाकृष्ण विखे-पाटील
छगन भुजबळ
रोहित पवार
आदित्य ठाकरे
जयंत पाटील
हे दिग्गज हरले
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
अमित ठाकरे
बाळा नांदगांवकर
हितेंद्र ठाकूर
8 क्षितीज ठाकूर
नवाब मलिक
हर्षवर्धन पाटील
रवींद्र धंगेकर
वैभव नाईक
रोहिणी खडसे
राजेश टोपे
धीरज देशमुख