महाराष्ट्र

भालचंद्र नेमाडेंना ‘साहित्यभूषण’ जाहीर; श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना २०२५ चा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना २०२५ चा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली. १० लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांमध्ये प्रौढ वाङ्मय प्रकारातील २२ पुरस्कारांना प्रत्येकी एक लाख रुपये, बालवाङ्मयातील ६ पुरस्कारांना प्रत्येकी ५० हजार, प्रथम प्रकाशन ६ पुरस्कारासाठी प्रत्येकी ५० हजार आणि सरफरोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या ३५ पुरस्कारांसाठी २९ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

विश्व मराठी संमेलनात यंदा नव्याने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये कलारत्न पुरस्कार गायक आणि गीतकार अजय-अतुल गोगावले (५ लाख रोख, सन्मानपत्र), विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार आळंदी येथील शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती कुरेकर यांना (५ लाख रोख, सन्मानपत्र) जाहीर झाला आहे. प्रकाशन संस्थेसाठी दिला जाणारा श्री. पु. भागवत पुरस्कार-२०२५ नांदेड येथील निर्मल प्रकाशन, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. दिलीप धोंडगे आणि इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर संस्था यांना (प्रत्येकी ५ लाख रोख, सन्मानपत्र), तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार - २०२५ विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला (प्रत्येकी ५ लाख रोख, सन्मानपत्र) जाहीर झाला आहे.

नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलनात पुरस्कारांचे वितरण

नाशिक येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्च असे चार दिवस विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात वरील सर्व पुरस्कारांसह २०२४ मधील ३५ यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग