Pune : जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊ रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना  
महाराष्ट्र

Pune : जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊ रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या गणरायाचे भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ‘श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त आगमन झाले.

Swapnil S

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या गणरायाचे भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ‘श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त आगमन झाले. ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

तत्पूर्वी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण आणि बुधवार चौकात सात थर रचून करण्यात आलेले बाप्पाचे जंगी स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार सकाळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर आढाव बंधूंचे नगारा वादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथातून बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी रंगारी भवन परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्त्यावरून ही भव्य मिरवणूक दिमाखात मार्गस्थ झाली. मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ तसेच शंखनाद यांसारख्या प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांनी अप्रतिम वादनाचा नजराणा सादर केला.

मिरवणूक बुधवार चौकात पोहोचताच कसबा पुणे दहीहंडी संघाच्या गोविंदांनी मानवी मनोरे रचून बाप्पाला शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात मानवंदना दिली. त्यानंतर कार्यकर्ते आणि भाविकांनी हवेत सप्तरंगांची उधळण केली. ढोलांच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी, हवेत उधळला जाणारा विविधरंगी गुलाल आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण बुधवार चौक दुमदुमून गेला.

प्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला.

‘राज्यातील सर्व विघ्न दूर होऊ दे’

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शुभहस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. बाप्पाच्या आगमनाने आम्हाला अतिशय आनंद झाला असून, पुढील दहा दिवस हा आनंद असाच कायम राहणार आहे. राज्यावरील सर्व विघ्न दूर कर आणि भरपूर पाऊस पडून सर्वत्र आनंदी आनंद होऊ दे. सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि धनसंपदा लाभावी, अशी प्रार्थना आम्ही बाप्पाकडे केली,” असे पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांनी सांगितले.

‘पहिल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे भाग्य’

आज महाराष्ट्रात येऊन हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचे परमभाग्य मला लाभले. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. या पवित्र सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे पूर्वसंचितच आहे. बाप्पाच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो, असे पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ बासरीवादक, यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

सीईटी परीक्षेचीही SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी