संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद; ९ जानेवारीपासून अंमलबजावणी

राज्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे पूर्ण होण्यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : राज्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे पूर्ण होण्यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातील अनेक कामे सुरू आहेत. भाविकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीत आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मंदिर ९ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्रीचा कालावधी वगळता मंदिर दर्शनासाठी बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याआधी लाखो भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत.

बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले