पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ? साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास कार्यक्रमावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप 
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ? साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास कार्यक्रमावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, स्वयंपाकाच्या गॅसला पर्यायी इंधनाचा काटकसरीने वापर, सोने खरेदीवर नियंत्रण, परदेश दौरे टाळणे आणि परकीय चलन वाचविण्याचे आवाहन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशवासीयांना केले आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप /कराड

सध्या सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध, डळमळीत झालेली जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार-व्यवसायांमध्ये निर्माण झालेली अस्थिरता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, स्वयंपाकाच्या गॅसला पर्यायी इंधनाचा काटकसरीने वापर, सोने खरेदीवर नियंत्रण, परदेश दौरे टाळणे आणि परकीय चलन वाचविण्याचे आवाहन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशवासीयांना केले आहे. मात्र, साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील ५ लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी होत असलेल्या खर्चावरून भाजपनेच आपल्या नेत्याच्या आवाहनाला हरताळ फासल्याची चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजप तसेच महायुतीतील मंत्री, खासदार, आमदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी २ ते ४ हेलिपॅड, मंत्र्यांसाठी शेकडो गाड्यांचा ताफा, पोलीस बंदोबस्तातील वाहने, लाभार्थ्यांसाठी ४०० एसटी बसेस, खासगी वाहनांची व्यवस्था, हजारो फूड पॅकेट्स, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, पंखे आणि कुलर यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले असतानाही भाजपच्या मंत्र्यांकडून आणि सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारी कार्यक्रमाच्या नावाखाली पक्षीय स्वरूपाचा कार्यक्रम राबवून सरकारी तिजोरीवर ताण आणला जात असल्याने विरोधकांना भाजपला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. “सर्वसामान्य जनतेने काटकसर करावी, अशी अपेक्षा करणारे भाजपचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री स्वतः मात्र त्या आवाहनाची अंमलबजावणी का करत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

खर्चाचाही धुरळा

शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारणीचे काम सुरू असून, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. सध्या तीव्र उन्हाळा आणि वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुरळा उडत असतानाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर्चाचाही धुरळा उडत असल्याची टीका होत आहे.

सरकारी तिजोरीतून कोट्यवधींची उधळपट्टी

या कार्यक्रमासाठी २ ते ४ हेलिपॅड, मंत्र्यांसाठी शेकडो गाड्यांचा ताफा, पोलीस बंदोबस्तातील वाहने, लाभार्थ्यांसाठी ४०० एसटी बसेस, खासगी वाहने, हजारो फूड पॅकेट्स, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, पंखे आणि कुलर यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असून, रोज लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

मंत्र्यांच्या संख्येनुसार हेलिपॅड

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी ३० लाख घरे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण आणि १० हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा कार्यक्रम सातारा येथे होत आहे. या कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लाभार्थ्यांसाठी ४०० एसटी बसेसचे नियोजन, फूड पॅकेट्स, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. तसेच, मंत्र्यांच्या संख्येनुसार हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई पालिकेला २,५८७ कोटींचा GST परतावा; राज्यातील २९ पालिकांना नुकसानभरपाई अनुदानापोटी ५,५३२.२७ कोटी

प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच आता विमान प्रवास; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द

Assam : हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Tamil Nadu : अण्णाद्रमुकमध्ये फूट, एक गट मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत