महाराष्ट्र

महायुतीत त्रांगडे! ३६ जागा लढण्याच्या तयारीत भाजप, शिंदे-अजितदादांची शहांनी काढली समजूत; "विजयाची खात्री" हा निकष लावणार

महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निराशा होण्याची शक्यता...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निराशा होण्याची शक्यता आहे. भाजप कमळ चिन्हावर ३६ उमेदवार मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहे. त्यात छ. संभाजीनगर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी व सातारा मतदारसंघाचा समावेश आहे. ३६-८-४ अशा जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांची समजूत काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ‘विजयाची खात्री’ या निकषावर दिल्लीतच या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे त्रांगडे लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत.

"विजयाची खात्री" व भारतीय जनता पक्षाने विविध संस्थांमार्फत केलेले सर्वेक्षण या निकषावर महायुतीने फॉर्म्युला निश्चित केल्याचे सांगण्यात येते. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला दिल्या जाणाऱ्या मतदारसंघांत बारामती, रायगड, भंडारा-गोंदिया व शिरुर या मतदारसंघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे बैठक व सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यानंतर रात्री मुंबईत दाखल होत सह्याद्री अतिथीगृह येथे रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, तोडगा निघाला नाही. भाजप फारशी जोखीम न घेता जागावाटपावर भर देत आहे. जिंकण्याच्या अटीवर जागावाटप होणार असल्याचे सूतोवाच अमित शहा यांनी केले. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोजक्याच जागा मिळणार असल्याने दोन्ही गटांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

‘भाजपला मिशन ४००’चा आकडा गाठायचा आहे. त्यामुळे फारशी जोखीम न उचलता मित्र पक्षांसोबत जागावाटप करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र, राज्यात भाजपसोबत युतीत सामिल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट पॉवरफुल आहेत. त्यामुळे त्यांनाही सन्मानजनक तोडगा निघावा, अशीच अपेक्षा आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रह धरला. त्यातच अजित पवार यांनाही किमान १० जागा हव्या आहेत. त्यासाठी त्यांनीही मागणी लावून धरली. मात्र, भाजप ३६ पेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला जिंकण्याच्या अटीवरच जागा मिळू शकतात, असे स्पष्ट संकेत भाजपने दिल्याने दोन्ही गट नाराज आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तोडगा न निघाल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी थेट दिल्ली गाठली आहे. तेथे महायुतीच्या जागांवर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

भाजपला हवी मुंबईवर पकड

भाजपने एकीकडे राज्यात महत्त्वाच्या जागा आपल्या हातात ठेवतानाच मुंबईत आपली मजबूत पकड निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत फक्त एक जागा देण्याचाच विचार आहे. त्यामुळे मुंबईत शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघावरही पाणी सोडावे लागू शकते, असेही बोलले जात आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे.

घटक पक्षांना सन्मानजनक जागा

दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांना भाजप एक आकडी जागा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भाजप आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?