पेण : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन, खोपोली, उरण, कर्जत आणि माथेरान या दहा नगरपालिकांसाठी नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीमधील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसून आले. विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी पक्षांतील कुरघोडीच निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिल्याचे पाहायला मिळाले. दहा नगरपालिकांपैकी ३ नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), ३ नगरपालिका शिवसेना (शिंदे गट), १ नगरपालिका भाजप, १ शेकाप, १ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर १ नगरपालिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ने जिंकली आहे.
पेण नगरपरिषदेत भाजपचे ८ नगरसेवक निवडून आले असून यापूर्वी ३ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे एकूण ११ नगरसेवक झाले आहेत. या निकालामुळे प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, नगरसेवक पदाच्या निकालांवरून पेणमध्ये भाजपची एकहाती सत्ता नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांना साथ लाभल्याचे स्पष्ट झाले आहे.
४७३ मतदारांची ‘नोटा’ला पसंती
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रितम पाटील यांनी बाजी मारत नगराध्यक्षपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. त्यांनी ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’च्या उमेदवार रिया धारकर यांचा ५,८६१ मतांनी पराभव केला. प्रितम पाटील यांना १४,२७३ मते मिळाली, तर रिया धारकर यांना ८,४१२ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना अवघी ६८७ मते मिळाली असून, ‘नोटा’ला ४७३ मतदारांनी पसंती दिली.