महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) यंदा ‘बिनविरोध पॅटर्न’ राबवल्याचे दिसत आहे. अनगर नगरपंचायत, धुळेच्या दोंडाईनंतर आता भाजपने जळगावच्या जामनेर नगरपालिकेत मोहोर उमटवली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगरपालिकेत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विसपुते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.
एकनाथ शिंदे गटासाठी धक्का
जामनेरमध्ये साधना महाजन यांची निवड बिनविरोध ठरल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला आहे. कारण भाजप विरोधी उभ्या असलेल्या शिंदे गटातील उमेदवार वॉर्ड १ मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड १३ मधील रेशंता सोनवणे यांनी अर्ज मागे घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी, या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना यांची लढत रद्द झाली.
भाजपचे ५ उमेदवार बिनविरोधी विजयी
जामनेर नगरपालिका निवडणुकीत २७ पैकी ५ जागा भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध मिळाल्या आहेत. आतापर्यंत उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील आणि नानाभाऊ बाविस्कर अशी नावे बिनविरोध विजेत्यांमध्ये समाविष्ट आहेत. या यशाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक विकासकामे आणि नेतृत्वावर मतदारांचा विश्वास यामुळे मतदारांनी बिनविरोध निवड देत भाजपवर आपला विश्वास दर्शविला आहे. आता भाजपच्या बिनविरोध विजेत्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजप मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य विजयी
सोलापूरच्या अनगर नगरपंचायत, धुळेच्या दोंडाई आणि जळगावच्या जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या विजयी तीनही उमेदवार महिला असून त्यापैकी दोन विद्यमान भाजप मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. धुळेच्या दोंडाईमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल आणि सोलापूरच्या अनगर नगरपंचायतमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.
फडणवीस कुटुंबीयाचा विजय
अमरावती येथील चिखलदरा नगरपरिषदेत भाजपचे नगरसेवक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती देखील बिनविरोध विजयी ठरले आहेत. येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सहज पार पडली. या पद्धतीच्या बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता प्रभावीपणे मजबूत केली असून, आगामी निवडणुकांसाठी ही रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.