रोहित चंदावरकर/पुणे
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी मराठा व ब्राह्मण समाजाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. कारण पुण्यात ब्राह्मण व मराठा मतदार मोठ्या संख्येने आहेत. यातील कोणताही मतदार नाराज होऊ नये म्हणून भाजपने कंबर कसली आहे. याचेच प्रत्यंत्तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शक्तिप्रदर्शनात दिसून आले.
चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. कोथरूड ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मिरवणुकीत ब्राह्मण व मराठा समाजातील नेत्यांना विशेष स्थान देण्यात आले होते. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व खासदार मेधा कुलकर्णी या मिरवणुकीत प्रामुख्याने सहभागी झाले होते. मराठा व ब्राह्मण समाजाच्या नेत्यांचे संतुलन यातून साधण्यात आले. पुणे शहरात मराठा व ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप जातीची समीकरणे जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपने चार दिवसांपूर्वी आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत शिवाजीनगर, कोथरूड व पर्वती मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. पण, कसबा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाने न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेली २५ वर्षे कसबा विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर हे कसबा मतदारसंघातून विजयी झाले. याचा मोठा धक्का भाजपला बसला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये आता मोठ्या प्रमाणावर अंतर्गत चर्चा सुरू आहे. चिंचवड व भोसरी या पुणे उपनगरातील जातीचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. कसबा, कोथरूड व पर्वती या मतदारसंघांत ब्राह्मण व मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
काही महिन्यांपूर्वी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले. त्यांच्या गळ्यात तत्काळ केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली. शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. शिरोळे हे मराठा समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. जातीच्या समीकरणाबरोबरच भाजपने विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुणे विमानतळाच्या विस्ताराचे उद्घाटन आचारसंहितेच्या पूर्वी करण्यात आले. तसेच पुण्यातील नवीन मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले. भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या भाषणात पुण्यातील विविध विकास कामांचा मुद्दा आहे.
पुण्यातील मतदार आता कॉस्मोपॉलिटन
पुणे हे शहर पूर्वी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजले जात होते. आता आयटी कंपन्या, वाहन कंपन्या, शैक्षणिक संस्थांचे माहेरघर पुणे बनले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यातील मतदार आता कॉस्मोपॉलिटन बनला आहे. या मतदारांकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
‘पंतप्रधान मोदींच्या दोन सभा व्हाव्यात’
पुणे व उपनगरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या जास्तीत जागा जिंकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. या जागा जिंकल्यास विरोधक ‘मविआ’वर मानसिकदृष्ट्या विजय मिळू शकेल. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान दोन सभा व्हाव्यात, अशी भाजपच्या राज्य नेतृत्वाची इच्छा आहे. त्यातील एक सभा पुण्यातील मध्यभागी व दुसरी सभा ग्रामीण भागात व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.