मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून असलेली शिवसेनेची सत्ता जाण्याचे संकेत ‘एक्झिट पोल’ने दिले असून भाजपप्रणित महायुती मुंबई मनपावर सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘एक्झिट पोल’चे हे अंदाज मुंबईवरील पकड कायम ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंसाठी धक्कादायक मानले जात आहेत. दरम्यान, राज्यातील २९ पैकी बहुतांश महापालिका ‘भाजपमय’ होणार असल्याचा अंदाजही या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील २९ मनपांचे मतदान गुरुवारी पार पडले. मतदानानंतर विविध संस्थांनी आपले ‘एक्झिट पोल’ गुरुवारी जाहीर केले. ‘पोल ऑफ पोल’च्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सरशी होईल व या दोन्ही पक्षांना मिळून १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण ६२ जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला २० जागा तर ७ अपक्ष उमेदवार विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘एक्सिस माय इंडिया पोल’नुसार मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाच्या युतीला एकूण १३१-१५१ जागा तर ठाकरे - मनसे आणि शरद पवार यांच्या युतीला ५८ ते ६८ जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला १२ ते १६ जागा मिळू शकतात. यासह ६ ते १२ अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे.
मुंबईत भाजपला ४२ टक्क्यांपेक्षा अधिक मते, ठाकरेंच्या आघाडीला ३२ टक्के मते तर इतरांना एकूण १३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीयांची ६८ टक्के मते भाजप महायुतीला, उबाठा आघाडीला १९ टक्के, काँग्रेसला २ तर अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतीयांची ६१ टक्के मत भाजपला, उबाठाला २१ टक्के, काँग्रेसला ८ टक्के, अन्य पक्षांना १० टक्के मत मिळू शकतात. मुस्लिमांची १२ टक्के मते भाजप महायुतीला, उबाठाला २८ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के, अन्य पक्षांना १९ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच
पिंपरी-चिंचवड मनपात भाजपच बाजी मारण्याचा अंदाज आहे. ‘पोल ऑफ पोल’च्या एक्झिट पोलनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला ६४ जागा, शिवसेना शिंदे गटाला ०९, राष्ट्रवादीला ५१, शरद पवार गटाला २ आणि काँग्रेस व मनसेला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूरमध्ये भाजप आघाडीवर
कोल्हापूरमध्ये भाजपच आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे. ‘पोल ऑफ पोल’च्या अंदाजानुसार कोल्हापूरमध्ये भाजपला २९ ते ३२, शिवसेनेला १८ ते २१, राष्ट्रवादी अजित पवार गट ९ ते ११ जागा राष्ट्रवादी (शप) १ जागा मिळू शकते. मनसेला १ जागा तर २ ते ४ जागा अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे.
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचेच वर्चस्व
साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, वसई - विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे ७२ नगरसेवक निवडून येण्याचा अंदाज आहे. तर भाजप - २७, शिंदेसेना - ५, काँग्रेसला -३, ठाकरे गटाला - ७ जागा मिळू शकतात. त्यामुळे हितेंद्र ठाकूर आपला गड राखणार असल्याचे दिसत आहे.
उल्हासनगरमध्ये महायुती
उल्हासनगरमध्ये भाजपाला २८, शिवसेना शिंदे गटाला २९ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४ जागा मिळू शकतात. तसेच इतर १२, काँग्रेसला २, शिवसेना ठाकरे गटाला १, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १५, तर मनसेला २ जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
सांगलीत भाजपला एकहाती सत्ता?
साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप - ३८, शिवसेना शिंदे गट - ४, अजित पवार गट - १०, काँग्रेस - १६, शरद पवार गट - १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सोलापुरात भाजपचे वर्चस्व
साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, सोलापुरात भाजपला मोठे यश मिळू शकते. तब्बल ६२ जागा भाजपला मिळू शकतात. शिवसेना शिंदे गटाला १५ तर अजित पवार गटाला - ४ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस - १२, शिवसेना ठाकरे पक्ष - २, राष्ट्रवादी शरद पवार गट - १, एमआयएमला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ठाण्यात शिंदे बालेकिल्ला राखणार
‘साम टीव्ही’च्या एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदे ठाण्यात सत्ता कायम राखणार आहेत. जवळपास ७२ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात भाजप सत्ता स्थापन करणार
यंदा पुण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढत होते. त्यात अजित पवारांनी भाजपवर आरोप केल्यानंतर ही निवडणूक रंगतदार झाली. पुण्यात भारतीय जनता पक्षाला ९३ जागा, शिवसेना (शिंदे गट) यांना ६ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४३ जागा, शिवसेना ठाकरे गटाला ७ जागा, काँग्रेसला ८ जागा तर इतरांना दोन ते पाच जागा मिळतील, असा ‘टीव्ही ९-पीआरएबी’ सर्व्हेचा अंदाज आहे. पुण्यात १६५ जागा आहेत. त्यामुळे भाजपला ९३ जागा मिळाल्यास ते सहजपणे सत्ता स्थापन करू शकतात.
नवी मुंबईतही भाजपच
नवी मुंबईत भाजप - ६४ जागा, शिवसेना शिंदे गटाला ४० जागा, मनसेला - १, शिवसेना ठाकरे गट - ४, राष्ट्रवादी शरद पवार गट -१ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप ४२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे ६ जागांवर, काँग्रेस २ जागांवर, शिवसेना ठाकरे गट २ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर, वंचित बहुजन आघाडी २ जागांवर आणि इतर ६ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
नाशकात विरोधकांचा सुपडा साफ
नाशिकमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला -५, काँग्रेस -१, शरद पवार गटाला - १ तर मनसेला २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाला - ५५, भाजपला - ५२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.