महाराष्ट्र

आमची सत्ता आणा, जुनी पेन्शन लागू करू! उद्धव ठाकरेंचा सरकारी कर्मचाऱ्यांना शब्द

देशभरातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना केंद्रातील सरकार मात्र नव्या पेन्शन योजनेवर अडून बसले आहे, अशी टीका करून ‘आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करू’, असा शब्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत बोलताना दिला.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : देशभरातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना केंद्रातील सरकार मात्र नव्या पेन्शन योजनेवर अडून बसले आहे, अशी टीका करून ‘आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करू’, असा शब्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत बोलताना दिला.

उद्धव ठाकरे हे रविवारी शिर्डी, छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. प्रारंभी, शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला हजेरी लावली़ यावेळी ठाकरे यांनी केंद्र सरकार व शिंदे सरकार या दोघांनाही टीकेचे लक्ष्य केले़ ठाकरे म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही, असे म्हणतात़ तुम्हाला काय वाटते, राज्यातील मिंधे सरकार जुनी पेन्श्न लागू करण्याची घोषणा करेल? दिल्लीला विचारल्याशिवाय हे मिंद्यांचं सरकार काहीच करू शकत नाही. पण, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याचा माझा शब्द आहे. मात्र शब्दाला ताकद देण्याची जबाबदारी तुमची आहे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत!

सध्या गाजत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खरमरीत शब्दात टीका केली़ ‘‘गेलेली सत्ता परत येते आणि जाते, यावेळी गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे. त्यामुळे एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झाले, ते तुमच्या सोबतही होईल. यांना पेन्शन नाही, टेन्शन द्यायला हवे. आपले आंदोलन असे असायला हवे की हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत, हा निर्धार करा. आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अंमलात आणल्याशिवाय राहायचे नाही. निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहिती नव्हते, त्यांनी एकदम लाडकी बहीण आणली’, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही नाही

माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!