संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

सी-६० जवानांना 'सेवा पदक'; नक्षलवादविरोधी कामगिरीचा गौरव

महाराष्ट्रातील नक्षलवादविरोधी मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या 'सी-६०' विशेष कृती दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘सी-६० सेवा पदक’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

सोमेंद्र शर्मा/मुंबई

महाराष्ट्रातील नक्षलवादविरोधी मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘सी-६०’ विशेष कृती दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘सी-६० सेवा पदक’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या या जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हे पदक सुरू करण्यात आले आहे.

१ डिसेंबर १९९० रोजी सशस्त्र नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ६० जवानांच्या बळासह हे दल स्थापन करण्यात आले होते. सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात २९ पथके आणि गोंदिया जिल्ह्यात ९ पथके कार्यरत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने डिसेंबर २०२५ मध्ये या दोन्ही जिल्ह्यांचे वर्गीकरण ‘लिगसी अँड थ्रस्ट डिस्ट्रिक्ट्स’ म्हणून केले आहे.

‘सी-६०’ पथकांकडून घनदाट जंगले, डोंगराळ भाग आणि दुर्गम नद्या-नाल्यांच्या प्रदेशात नियमितपणे शोधमोहिमा, गस्त आणि गुप्तचर माहितीवर आधारित कारवाया केल्या जातात. या दलात निवड होण्यासाठी कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्या द्याव्या लागतात. त्यानंतर जवानांना गडचिरोलीतील किटाली येथील कमांडो प्रशिक्षण केंद्रात आणि नागपुरातील अपरंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात जंगल युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या दलातील जवानांनी आतापर्यंत ३२० पोलीस शौर्य पदके, ६ राष्ट्रपती शौर्य पदके, ८ गुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि २ शौर्य चक्रे पटकावली आहेत.

गृह विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 'फोर्स वन' आणि 'क्विक रिस्पॉन्स टीम’च्या धर्तीवर आता ‘सी-६० सेवा पदक’ मंजूर करण्यात आले आहे.

५०० जवानांना पदक मिळणार

पदकासाठीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवले जातील. पहिल्या दोन वर्षांत दरवर्षी ५०० जवानांना हे पदक दिले जाईल आणि त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांना ते प्रदान केले जाईल. हे पदक तांब्यापासून बनवलेले, ३५ मिमी व्यासाचे आणि ३ मिमी जाडीचे असेल. पदकाच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र पोलिसांचे बोधचिन्ह आणि मराठीत ‘सी-६० सेवा पदक’ असे कोरलेले असेल, तर मागील बाजूला विशेष कृती दलाचे बोधचिन्ह असेल.

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद

'मानिकी' उपचारासाठी 'वनतारा'मध्ये दाखल; वर्षानुवर्षांच्या यातनांनंतर वेदनादायी प्रवासाचा अंत

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास