महाराष्ट्र

“..तर गद्दारांना पाडण्यासाठी निवडणूक लढणार”, चंद्रकांत खैरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात चंद्रकांत खैरे निवडणूक लढवू इच्छित आहेत.

Suraj Sakunde

येत्या महिन्याभरात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास गद्दारांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना हरवणार असं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात चंद्रकांत खैरे निवडणूक लढवू इच्छित आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत खैरे म्हणाले की, “माननीय उद्धव साहेबांनी जर आदेश दिला, तर मी लढेन. कारण मला गद्दारांना पाडायचं आहे. गद्दार या ठिकाणी माझ्यामुळे निवडून आले. मी त्यांच्यासाठी अडीच हजार लोकांना फोन केले होते. ते फुटले. ते फुटले त्याचं आम्हाला दुःख आहे. प्रत्यक्षात अशा व्यक्तींना जर पाडायचं असेल तर माननीय उद्धव साहेब जो आदेश देतील, तो स्वीकारायला मी तयार आहे,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

यावेळी धोका झाला...

चंद्रकांत खैरे म्हणाले की, “मी या मतदारसंघात पहिला हिंदू आमदार झालो होतो. १९९० मध्ये मी आमदार झालो, नंतर १९९५ लाही मी निवडून आलो. त्यानंतर मग मला माननीय शिवसेना प्रमुखांनी दिल्लीत पाठवलं. दिल्लीत मी २० वर्षे म्हणजेच चार टर्म काढल्या. नंतर यावेळी धोका झाला. काही लोकांनी धोका दिला. यांचा पैशांचा वापर इतका मोठ्या प्रमाणात चालला. हेलिकॉप्टरने पैसे आले. पोलीस आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. लोकसभेला पैशांचा वापर करुन मला पाडण्यात आलं. आता लोक चिडले आहेत. आता उद्धव ठाकरेंचं वलय, शरद पवारांचं वलय आहे, काँग्रेस महाविकास आघाडीचं जे वलय आहे, त्यातून ही विधानसभेची जागा जिंकायचीये. कन्नड, विजापूर, गंगापूर या जागाही जिंकायच्या आहेत.”

संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजी नगर पश्चिम ही जागा लढवणार का? या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “मला जर आदेश आला, तर नक्की लढणार. कुणीतरी बाहेरून यायचं, त्याला तिकीट द्यायचं हे लोकांना पटलेलं नाहीये. आपल्या इथून आपला माणूस नाहीये का कुणी? मी एकनिष्ठ आहे आणि तो गद्दार आहे. एकनिष्ठच गद्दाराला पाडू शकतो. राजू शिंदे आमच्या पक्षात आले त्याबद्दल अंबादास दानवेंनी मला सांगितलं नाही. मी प्रवेश घेताना त्याला व्यासपीठावर पाहिलं. राजू शिंदेंनी मला पाडलं. जे उद्धव ठाकरेंना मनाला लागलं आहे. ही गोष्ट कुणी केली? राजू शिंदेंनी. मग अशा व्यक्तीला कोण निवडून देईल? ” असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तारांवरही टीका....

चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "ते (अब्दुल सत्तार) पालकमंत्री झालेत. त्यांची खूप इच्छा होती पालकमंत्री व्हायची. आता बघू किती दिवस काम करतायत आणि काय करतायत. मीही या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मी कसं काम केलं होतं ते जनतेला माहितीये. तो माणूस इतकी गद्दारी केली. कोर्टाचे समन्स यायला लागले आणि यांनी त्याला पालकमंत्री केलं. दुसरा कोणी माणूस नव्हता का? गद्दारांना पालकमंत्री केलं म्हणजे गद्दारांना आम्हाला पाडावं लागेलच ना, म्हणून त्यासाठी व्यूहरचना आम्हाला करावी लागेल."

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी