महाराष्ट्र

"४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू," चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात श्री बावनकुळे यांनी, भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचल्याचा उल्लेख केला आहे. श्री बावनकुळे पत्रातून आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी- माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते, असा उल्लेखही त्यांनी पत्रातून केला आहे. 

राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे, भाजपचे कार्यकर्ते अविश्रांत राबल्यामुळे निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालणार असून ४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू  आणि महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू, असा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केला. 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. ते कुटुंब आहे. आपणा सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे आहे. या निवडणुकीत ही आपलुकी, जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवला. हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 

या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचे नियोजन, रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गणतीच नाही.  एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत, काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबलात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे. हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त