मुंबई : एखाद्या व्यक्तीला पद मिळाले म्हणजे ती पॉवर नसते तर ती जबाबदारी असते. प्रत्येकाने जातपात बाजूला ठेवून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सक्षम राज्यघटना दिल्याने भारतातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते. देशाला दोन महिला राष्ट्रपती लाभल्या असून एक सध्या कार्यरत आहेत. तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महिला होत्या, पोलीस महासंचालक महिला आहे. त्यामुळे राज्य घटनेची ताकद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मंगळवारी विधी मंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधिमंडळ आणि माझे जुने नाते असून आज माझा सत्कार करण्यात आला हा सत्कार सभागृहाने केला नसून राज्यातील १२ कोटी ८७ लाख जनतेने केलेला सत्कार आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सतेज पाटील, विक्रम काळे, प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांना १४ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली होती. भूषण गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. अमरावतीत मराठीतून शिक्षण घेतले, मुंबईत शिक्षण घेतले आणि भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदावर वेगवान प्रवास केला. महाराष्ट्रातील सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नियुक्तीनिमित्त मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानाबाबत यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी भूषण गवई यांनी नागपुरातील बेकायदा बांधकामातील कारवाईचा किस्सा सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बघितले आणि म्हणाले अजित पवार, मला अधिकारी घाबरतात, हे बोलताच सभागृहात हशा पिकला. जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी भारतीय संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकारांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. ही तारेवरची कसरत असते. मी नेहमीच म्हणत आलो आहे की, मला हे पद देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी दिलेली संधी आहे, असेही ते म्हणाले.
सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय - एकनाथ शिंदे
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातली एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसते याचा आनंद सगळ्यात जास्त आहे आणि भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत तर, महाराष्ट्राचे भूषण देशाच्या न्यायप्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत. महाराष्ट्राला कर्तव्यकठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा आहे आणि हा वारसा भूषण गवई यांच्या सरन्यायाधीशपदी निवडीमुळे पुढे जाईल असा विश्वास मला वाटतो, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मराठी माणूस सर्वोच्च पदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे सुपुत्र भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राचा मराठी माणूस भारताच्या सर्वोच्च पदी पोहोचल्याने राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश गवई यांच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण आहे. नागपूरमधील झोपडपट्टी तोडून टाकण्याचा निर्णय झाला, त्यावेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. अतिशय सामान्य माणूस असा असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश गवई यांनी दाखवून दिले आहे. आमदार निवासात राहायला असताना ते जनतेच्या राहण्याची व्यवस्था करून स्वत: व्हरांड्यात बसून अभ्यास करीत. मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले