महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी लवकरच विशेष अधिवेशन? शिंदे-फडणवीसांची विधानभवनात तातडीची बैठक

Suraj Sakunde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात बैठक होत आहे. विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा सुरु आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सभापती निवड या तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकते. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन?

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन मागे घ्यावं, म्हणून सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सध्या मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आंदोलन सुरु असून त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दरम्यान सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करू नयेत, यासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजानंही आंदोलन सुरु केलं आहे. यामुळं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी तसेच सभापती निवड-

त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात बैठक होत आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी तसेच सभापती निवड इत्यादी विषयांसाठी विशेष अधिवेशन बोलावता येईल का, यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याविषयीही चर्चा होणार असल्याचं समजतंय.

शरद पवारांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट:

मराठा आरक्षणावर आपण मध्यस्थी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच भेट घेत शरद पवारांना गळ घातली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘सह्याद्री’ अतिथीगृहात भेट घेतली व तब्बल एक तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नाही, मात्र ओबीसी, मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था