मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून येत्या महिन्यात होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ठाकरे यांना फोन करून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली.
सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार आणि ठाकरे यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात फडणवीस यांनी राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदार असल्याचे नमूद करत त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना राधाकृष्णन यांचा राज्याशी असलेला संबंध लक्षात घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली, असेही सांगण्यात आले.