संग्रहित फोटो
महाराष्ट्र

२-३ दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Swapnil S

मुंबई : मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भाला झोडपले असून यामुळे लाखो नागरिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील ‘हर’ व ‘लोहारा’ गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान भरपाईची पाहणी केली. ‘एनडीआरएफ’चे निकष दूर करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

निवारे उभारा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा!

आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवावा, याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण करावे, स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत, त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मराठवाडयात ११.६७ लाख हेक्टर पिकाचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ११.६७ लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून विश्रांती घेतली.

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील ११.६७ लाख हेक्टर जमिनीवरील पिक नष्ट झाले आहे. याचा मोठा फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यातील २८४ महसूल मंडळात पावसाचा तडाखा बसला. त्यातील ८३३ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. एकट्या नांदेड जिल्ह्यात ३.३४ लाख हेक्टर पीक वाया गेले. तर ५२३ जनावरांचा मृत्यू झाला तर ११२६ गावांचे नुकसान झाले.

या अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील जलसाठा वाढला आहे. ११ धरणातील जलसाठा ७७.६३ टक्के झाला.

मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहेत. या धरणाच्या पाण्याचा वापर उद्योग, कृषी व पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत