मुंबई : विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षांत ३२ लाख मतदार वाढले, तर मग अवघ्या सहा महिन्यांत ४८ लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी शनिवारी केली.
लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे; परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला व त्याचा फायदा युतीला झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.