सी. पी. राधाकृष्णन 
महाराष्ट्र

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी, अनेक राज्यांचे गव्हर्नर बदलले!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते मंडळी राजकीय गणितांची जुळवाजुळव करत असताना थेट दिल्लीहून राज्यपाल बदलीचे वारे वाहू लागले व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी रात्री उशिरा राज्यपालांच्या बदल्या व नियुक्त्यांचे परिपत्रक जारी केले.

Swapnil S

मुंबई : झारखंडचे आताचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक जारी केले. राज्यपाल रमेश बैस यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ रविवार, २८ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नवी नियुक्ती होणार, असे संकेत मिळत होते. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशातील अनेक राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

दरम्यान, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड, छत्तीसगड, मेघालय, पंजाब, आसाम आणि मणिपूर या राज्यांतही नव्या राज्यपालांची नेमणूक करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते मंडळी राजकीय गणितांची जुळवाजुळव करत असताना थेट दिल्लीहून राज्यपाल बदलीचे वारे वाहू लागले व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी रात्री उशिरा राज्यपालांच्या बदल्या व नियुक्त्यांचे परिपत्रक जारी केले. त्यामुळे रमेश बैस यांच्याजागी आता सी. पी. राधाकृष्णन राज्यपालपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आताचे झारखंडचे राज्यपाल असलेल्या राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याने झारखंडच्या राज्यपालपदाची सूत्रे संतोषकुमार गंगवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. यामध्ये राजस्थान - हरिभाऊ बागडे, तेलंगण - जिष्णु देव वर्मा, झारखंड - संतोष कुमार गंगवार, आसाम व मणिपूरसाठी लक्ष्मण प्रसाद आचार्य, पंजाब - गुलाबचंद कटारिया, छत्तीसगढ़ - रमन डेका, मेघालय - सी. एच. विजय शंकर, सिक्कीम - ओम प्रकाश माथुर, पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदी - के. कैलाशनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणाला हटवले?

कलराज मिश्रा (राजस्थान), विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), रमेश बैस (महाराष्ट्र), बनवारीलाल पुरोहित (पंजाब-चंदिगड), अनुसुईया उईके (मणिपूर) आणि फगू चौहान (मेघालय) यांना हटवण्यात आले आहे. तर आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाबच्या राज्यपालांसोबतच चंदिगडचे प्रशासक म्हणूनही पदभार स्वीकारतील. सी.पी. राधाकृष्णन (झारखंडहून महाराष्ट्र), गुलाबचंद कटारिया (आसामहून पंजाब-चंदिगड), लक्ष्मण आचार्य (सिक्कीमहून आसाम, मणिपूर) या तीन राज्यपालांना इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

सी.पी. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रिय असून वयाच्या १६ व्या वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे नाते जोडले गेले. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूत भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी