मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच आपल्या गोविंदांना स्पेनलाही पाठवणार आहोत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी केली. तसेच उत्सव साजरे करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी उत्सव मंडळांना केले.
महाराष्ट्रातील दहीहंडी पथक, गोविंदा आणि दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या सहभागातून स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या’ वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कृष्णानंद सोहळा’ रविवारी परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघ, मजदूर मंदिर येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांसह महाराष्ट्रातील महिला व पुरुष दहीहंडी पथके, गोविंदा तसेच दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करणे, गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामुहिक श्रीकृष्ण आरतीही करण्यात आली.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, आवश्यक खबरदारी घ्यावी, रहदारीचे, वाहतूकीचे नियम पाळा, पादचारी, नागरिक यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि उत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घ्यावा, असे आवाहन यावेळी शेलार यांनी केले.