बीडमध्ये खंडणीसाठी महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी X - @BEEDPOLICE
महाराष्ट्र

बीडमध्ये खंडणीसाठी महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी; सरपंच मंगल ममदगे यांची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

ममदापूर गावाच्या महिला सरपंच मंगल ममदगे यांच्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्याने माजी सरपंच आणि अन्य दोन जणांनी ममदगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Swapnil S

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. आता जिल्ह्यातील ममदापूर गावाच्या महिला सरपंच मंगल ममदगे यांच्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्याने माजी सरपंच आणि अन्य दोन जणांनी ममदगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर गावाच्या सरपंच मंगल ममदगे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. माजी सरपंच वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख आणि ज्ञानोबा श्रीमंत देशमुख यांनी आपल्याकडे एक लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि धमकी दिली, असे ममदगे यांचे म्हणणे आहे.

मंगल ममदगे यांनी यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. बीड पोलीस अधीक्षकांकडे गेल्यानंतरच प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ममदगे यांचे पती राम ममदगे यांनी सांगितले की, खंडणीची रक्कम न दिल्यास सरपंच म्हणून काम करू दिले जाणार नाही, अशी तिघांनी धमकी दिली आहे.

महिला सरपंचावर झालेला हा दबाव आणि धमकी गंभीर असून, खंडणी व राजकीय द्वेषातून होणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आजची मतमोजणी रद्द! नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला

Drumstick Pickle : डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...

PCOS ने त्रस्त आहात? 'या' योगासनांनी मिळेल नैसर्गिक आराम

झोपडपट्टी मुक्तीसाठी समूह पुनर्विकासाचा पर्याय

महायुतीच्या गोंधळात निवडणूक आयोगाची भर!