अरविंद गुरव/पेण
विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील सर्व पक्ष आहेत. तसेच दुसरीकडे राहुल गांधी आहेत. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. महायुतीत एकीकडे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गट, रामदास आठवले यांचा पक्ष, कवाडे यांचा पक्ष, जानकरांचा रासप आहे आणि आता राज ठाकरेंच्या मनसेची साथ महायुतीला लाभली आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणी राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी महायुतीची जाहीर सभा पेण येथे पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे. सामान्य माणसांसाठी जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळा भारत देश हाच त्यांचा परिवार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राहुल गांधी त्यांचे इंजिन दिल्लीकडे ओढतात, शरद पवार त्यांचे इंजिन बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे त्यांचे इंजिन मुंबईकडे ओढतात. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, त्यामध्ये संजय राऊतांनाही जागा नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली.
तर आपल्या महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. त्यात गोरगरीब, आदिवासी, शेतकरी महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्वांना बसण्याची जागा आहे. सर्वांना यामध्ये बसून ‘सबका साथ सबका विकास’, म्हणत आपली विकासाची गाडी पुढे चालली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.