मुंबई : धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्यास हानीकारक उत्पादनांविरोधात त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. ‘एफडीए’च्या पथकांकडून दररोज राज्यभरात धाडी टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच अस्वच्छता बाळगणाऱ्या नामवंत हॉटेल्ससह, डेअरी व दुकानांचे परवानेच थेट निलंबित केले जात आहेत. दरम्यान, मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवाई आणि आक्रमक मोहिमेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कौतुक केले आहे.
जवळपास प्रत्येक दिवशी ‘एफडीए’च्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापानांवर कारवाई करुन भेसळयुक्त माल पकडला जात आहे किंवा हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरुन संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत.
भेसळखोरांवर कारवाईची होती गरज...
मुंढे यांच्या कामाच्या संदर्भात तसेच त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरू आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही ‘एफडीए’ची अशी धडक कारवाई सुरू राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विशेष कायदेशीर पथकाची लवकरच स्थापना
खाद्यपदार्थांमधील भेसळीचा नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी होताना कोणतीही कायदेशीर पळवाट किंवा त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या हेतूने तातडीने एका विशेष कायदेशीर पथकाची स्थापना करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.