नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना... 
महाराष्ट्र

नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना...

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "नसरापूर प्रकरणी अखेर फाशीची शिक्षा झाली. या निकालाने न्यायव्यवस्थेवरील...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. २९) न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे सांगत, अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "नसरापूर प्रकरणी अखेर फाशीची शिक्षा झाली. या निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही."

तपास यंत्रणांचे अभिनंदन

या प्रकरणाचा वेगाने आणि प्रभावीपणे तपास पूर्ण करून विक्रमी वेळेत न्याय मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर तसेच संपूर्ण तपास यंत्रणेचे अभिनंदन केले. तपास यंत्रणांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून खटल्याची सुनावणी वेगाने होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदीपसिंग गिल आणि अजय मिसर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे विशेष कौतुक केले. विक्रमी कालावधीत तपास पूर्ण करून न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे या प्रकरणाचा जलद निकाल लागल्याचे त्यांनी सांगितले.

'दुर्मिळातील दुर्मिळ' प्रकरण

विशेष न्यायालयाने या प्रकरणाला 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare) स्वरूपाचे मानत आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत होती.

नेमके काय घडले होते?

१ मे रोजी नसरापूर येथे भीमराव कांबळे याने खाऊचे आमिष दाखवून आणि नवजात वासरू दाखवण्याच्या बहाण्याने चिमुरडीला फूस लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला जनावरांच्या गोठ्याजवळील शेडमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिचा गळा व तोंड दाबून हत्या केल्याचे तपासात समोर आले.

वेगवान न्यायप्रक्रियेचे उदाहरण

या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून अल्पावधीत आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायालयात जलदगतीने सुनावणी पार पडली आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे हा खटला राज्यातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या महत्त्वाच्या POCSO प्रकरणांपैकी एक ठरला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार