धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेत पाण्याखाली जाऊन पिकं वाहून गेल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे धारशिवमधील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
म्हात्रेवाडी येथील लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय ४२) यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हात्रेवाडी परिसरातील शेतं पाण्यात बुडाली. सोयाबीन व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा शेती उभी करण्याची आशाही संपल्याने पवार हताश झाले होते. शेवटी त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संभाजीराजेंकडून दिलासा
घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पवार कुटुंबाला भेट दिली आणि एक लाख रुपयांची मदत केली. त्यांच्या या पावलाने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र शासकीय पातळीवर अद्याप ठोस मदत मिळाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने तातडीने मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मराठवाड्यात भीषण चित्र
धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. बीड, लातूर, नांदेड यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक जनावरे दगावली आहेत. खरिप हंगामात जवळपास २३ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेतकरी हवालदिल झाले असून, सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.