धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या केवळ संशयावरून दोन व्यक्तींनी या मुलाचे अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधत खालून आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलगा गंभीर भाजल्याने त्याच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपहरण करून शेतात नेलं, लोखंडी बैलगाडीला बांधलं
सातपूर गावातील हिमांशू नावाचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ शोधूनही तो सापडत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. अखेर मिळालेल्या माहितीवरून या घटनेचा थरकाप उडवणारा उलगडा झाला.
मुलाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंटू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी मुलाला जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केले. त्यानंतर शिरपूर–जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शिवारातील वीटभट्टी परिसरात नेऊन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली.
याच दरम्यान मुलाला लोखंडी बैलगाडीला घट्ट बांधण्यात आले आणि बैलगाडीखाली आग लावण्यात आली. आगीच्या तापमानाने गाडीचा लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशूलाही गंभीर चटके बसले. भीतीने त्याने 'लाईट आणून देतो' असे सांगून सुटकेची विनंती केली. एका क्षणी संधी साधून त्याने तिथून पळ काढला आणि घरी पोहोचत सर्व तपशील आई-वडिलांना सांगितला.
मेलास तर जेसीबीने खड्डा खणून गाडून टाकू
रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलाच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हिमांशूला निर्घृण मारहाण करत “कबुली दिली नाही तर अजून जाळू” अशी धमकी दिली. इतकंच नव्हे तर, “हा मेला तर जेसीबीने खड्डा खणून गाडून टाकू” अशी धमकीही दिल्याचे सांगितले.
पोलिसांची तत्काळ कारवाई
शिरपूर शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण, जीव घेण्याचा प्रयत्न तसेच बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरात या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.