'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण 
महाराष्ट्र

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

धुळे शहरात १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. CCTV फुटेजमध्ये दिसलेल्या विचित्र हालचालींमुळे गूढ अधिकच वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mayuri Gawade

धुळे शहरात एका १८ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ती घराबाहेर पडतानाचे आणि त्यानंतरचे काही क्षण सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्या दृश्यांमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

धुळे जिल्ह्यातील सरकारी दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथे राहणारी संजीवनी राहुल वराडे ही १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडताना दिसते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती वारंवार आजूबाजूला पाहताना दिसते. तिच्या हालचालींवरून ती चिंताग्रस्त आणि घाबरलेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

CCTV मध्ये संशयास्पद हालचाल

थोड्याच वेळात एक वृद्ध व्यक्ती तिच्या जवळून जाताना दिसते. त्यानंतर संजीवनीच्या हालचाली अचानक बदलतात. ती अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत उचललेला दिसतो, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे, अशी भावना निर्माण होते. या दृश्यामुळे परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अफवांना उधाण, अधिकृत दुजोरा नाही

या घटनेनंतर काहीजणांनी 'हिप्नोसिस'द्वारे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

माहितीनुसार, संजीवनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, तिचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटना घडल्यामुळे या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार