महाराष्ट्र

मतांसाठी भारतरत्न पुरस्काराचे वाटप! उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मोदी त्यांना हवे त्या व्यक्तीला भारतरत्न देत आहेत. कर्पूरी ठाकूर जेव्हा जिवंत होते, तेव्हा त्यांना जनसंघाने विरोध केला. आता बिहारमध्ये मते हवी आहेत, म्हणून त्यांना भारतरत्न देत आहेत. एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी आमची मागणी होती. त्यांना भारतरत्न देत असाल तर त्यांनी दिलेला अहवालही लागू करा. येत्या काळात आणखीही भारतरत्न जाहीर करण्यात येतील. भाजपला वाटते आहे की, अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल. पण, तसे होणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. भारतरत्न पुरस्कार नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या माध्यमातून जाहीर केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ मतांसाठी करत असल्याचे ते म्हणाले आहेत.

मुस्लीम समाजही आपल्यासोबत येत आहे. मी त्यांना विचारतो की, मी तर कडवट हिंदुत्ववादी आहे. मग आमच्यासोबत का येता. तर त्यांचे उत्तर असते की भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे, ते घर मोडते. धर्माने माणूस बनवला नाही. तुम्ही जे काही करत आहात ते पाप आहे. हे विषय लोकांपर्यंत पोचायला हवेत. तुम्ही जाऊन लोकांशी बोलायला हवे. मी संघाच्या लोकांना विचारतो की, तुम्ही याचसाठी केला होता का अट्टाहास? हे उपरे आता बसवले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे. त्या ध्वजावरून आता आपल्याच धर्माचे रक्त ठिबकत आहे. अजूनही माझ्या पक्षात जे भेकड आहेत त्यांनी आताही त्यांच्याकडे जावे. मला गरज नाही. मूठभर मावळे चालतील. तुम्ही देखील जिवंत मावळे आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला माझ्यासोबत सोन्यापेक्षा चांगली माणसे हवी आहेत. तुम्ही मला हवे आहात, असेही उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले.

भाजपचा निधी हा जनतेचाच पैसा

भाजपकडे कोट्यवधी रुपये आहेत. १३०० कोटींचा निधी भाजपला मिळाला आहे. भाडोत्री लोकही खूप आहेत. आजकाल भाडे मिळाले की काहीही मिळते. फोनवरून विचारले जाते की मोदी सरकारला मत देणार का? हा पैसा जनतेचा आहे. तो मोदी सरकार खर्च करत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त