Satara : जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात भाजपच्या वाट्याला प्रतीक्षा! राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकजुटीने गड राखला 
महाराष्ट्र

Satara : जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात भाजपच्या वाट्याला प्रतीक्षा! राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकजुटीने गड राखला

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणातून जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.

रामभाऊ जगताप

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणातून जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व असतानाच सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा सत्तागड राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकजुटीने राखला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी कराडचे उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी फलटणचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे भाजपला सत्तेच्या प्रमुख पदांपासून दूर राहावे लागले असून, जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

बुधवारी दुपारी सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक यांनी निवडीची घोषणा केली. यावेळी सर्व २१ संचालक उपस्थित होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीपूर्वी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी भाजपने खेळलेल्या राजकीय खेळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने जिल्हा बँकेच्या निवडीत सावध भूमिका घेत एकजूट दाखवली. त्यामुळे भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळू शकली नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषदेतील पूर्वीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा की पाच वर्षांचा, याबाबतही अद्याप स्पष्टता नसल्याने पुढील सत्तासमीकरणांबाबत उत्सुकता आहे.

रामराजे नाईक-निंबाळकरांची भूमिका महत्त्वाची

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपूर्वी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात झालेल्या चर्चेतून समन्वयाचा मार्ग निघाल्याचे मानले जात आहे. या प्रक्रियेत रामराजे नाईक-निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील ही निवड केवळ पदाधिकाऱ्यांची निवड न राहता सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या अंतर्गत राजकीय ताकदीचे प्रतिबिंब ठरली आहे.

सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान

नवनिर्वाचित अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासमोर माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या परंपरेचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचे आव्हान असेल. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करणे आणि संभाव्य अंतर्गत मतभेदांवर मात करणे, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बँकेची आर्थिक सुदृढता टिकवणे, शेतकरी सभासदांचे हित जपणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हे प्राधान्य असेल. सर्वांना विश्वासात घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले.

जयकुमार गोरेंचा सूचक इशारा

भाजपचा सदस्य म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात गैर काही नाही. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आपण सहभागी नव्हतो. त्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळाबाबतही आपल्याला माहिती नाही. जिल्हा बँकेची निवडणूक झाली म्हणजे सर्व काही संपले असे नाही, 'आगे आगे देखो, होता है क्या!' असे सूचक वक्तव्य मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार