दुष्काळाच्या झळांतही तरुणाईचा कलाविष्कार; नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत युवा महोत्सवाचा शुभारंभ 
महाराष्ट्र

दुष्काळाच्या झळांतही तरुणाईचा कलाविष्कार; नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत युवा महोत्सवाचा शुभारंभ

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव यंदा साधेपणाने आयोजित करण्यात आला आहे. युवा महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून शैक्षणिक अभ्यासक्रमाचाच एक भाग असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव यंदा साधेपणाने आयोजित करण्यात आला आहे. युवा महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून शैक्षणिक अभ्यासक्रमाचाच एक भाग असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी (दि.०५) सुरू होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

महोत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता शोभायात्रेने होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्घाटन समारंभ होणार आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार असून, सिनेअभिनेते व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कैलास वाघमारे, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील आणि डॉ. योगिता होके-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. युवा महोत्सव हा केवळ क्षणिक मनोरंजनाचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शिक्षणाची कार्यशाळा ठरतो. नाट्य, संगीत आणि ललित कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, ताणतणाव व्यवस्थापन आणि आत्मविश्वास विकसित होतो. पुस्तकी ज्ञानाला कलात्मक अभिव्यक्तीची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

मराठवाड्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खर्च टाळत मूळ कला आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीची जाणीव ठेवून शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणे, हा संवेदनशील प्रशासनाचा आदर्श ठरू शकतो.

१०७ महाविद्यालयांतील ६६८ कलावंत

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ३३३ महाविद्यालयांतील ३ हजार ७२ युवक कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणारे संघ केंद्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये १०७ महाविद्यालयांतील ६६८ कलावंतांचा समावेश असून, ३२५ मुले आणि ३४३ मुली सहभागी होणार आहेत.

चार रंगमंचांवर २८ कलाप्रकार

युवा महोत्सवात चार रंगमंचांवर विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. ‘नाट्यरंग’ नाट्यगृहात, ‘कलारंग’ नाट्यशास्त्र विभागात, ‘स्वररंग’ सिफार्ट सभागृहात, तर ‘ललितरंग’ या रंगमंचावर विविध कला सादरीकरण होणार आहे. एकूण २८ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल