भालचंद्र चोरघडे/मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील शिर्डी ते छत्रपती संभाजी नगर टप्प्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. या टप्प्यातील रस्ता उंच सखल असून त्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवताना कारचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर ८ तासांत पार होईल, असा दावा राज्य सरकारने केला होता. या रस्त्याला काही ठिकाणी तडे गेल्याने यापूर्वी बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नीरज वाणीकर यांनी सांगितले की, मी नेहमीच नाशिक, औरंगाबाद व नागपूर दरम्यान प्रवास करतो. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मी वेळ वाचवण्यासाठी त्यावरून प्रवास करतो. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. गेल्याच आठवड्यात मी या महामार्गावरून प्रवास केला. शिर्डी ते छत्रपती संभाजी नगर दरम्यानच्या टप्प्यात या महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. माझी एसयूव्ही कार या रस्त्यावरून जाताना डळमळत होती. मला तिचे नियंत्रण करणेही कठीण बनले होते, असा अनुभव त्यांनी कथन केला.
एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी याबाबत संपर्क साधल्यावर त्यांनी संभाजीनगर ते शिर्डीदरम्यान प्रवाशांना त्रास होत असल्याचे मान्य केले. प्रवाशांचा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्गाच्या या टप्यातील भेगा दुरुस्त करण्याचे काम आमचे कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंग व कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू आहे. ६ ते ७ काँक्रीटचे पॅनल बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या भागात कोणतेही खड्डे नाहीत. पण, रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यातील काही भेगा जुलैमध्ये तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आल्या. आता या रस्त्यावर काँक्रीट पॅनेल कायमस्वरूपी बसवण्यात येतील. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगरजवळ फतिहाबाद येथे काँक्रीट पॅनलला ४० मीटर लांबीची भेग पडली. त्यानंतर एमएसआरडीसीने जुलैमध्ये याचे काम सुरू केले.
सध्या समृद्धी महामार्ग इगतपुरी ते नागपूरदरम्यान सुरू आहे. ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा सुरू झाला. आता इगतपुरी ते आमने हा ७८ किमीचा मार्ग यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीने ठरवले आहे. या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता कसारा घाट भागातील १.८ किमीचा खर्डी पुलाचे काम सुरू आहे.