मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला पाहिजे, या दृष्टीने शेतकऱ्यांना सातत्याने भरघोस मदत देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. आता पुढच्या टप्प्यांमध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल केली जाईल. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये पाणी पोहोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा आढावा घेत महाराष्ट्र थांबणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना अंगीकारून लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी केल्याची आठवण करून दिली.
जगातील सर्वोत्तम राज्यघटना आपल्याला लाभली असून बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना निर्मिती समितीला आपण मानवंदना अर्पण करतो,” असे ते म्हणाले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर देशाची प्रगती उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. “महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर राज्य अधिक गतिमान आणि समृद्ध होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, शेतीला पाणी, वीज आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जलसंधारण, सिंचन आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. तसेच समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात असून सर्वसामान्यांना निवाऱ्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम, तसेच मोफत वीज योजनेसारख्या निर्णयांमधून समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
३० लाख कोटी रुपयांचे करार झाल्याचा उल्लेख
देश वेगाने प्रगती करत असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करत असून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचा दावा त्यांनी केला. दावोस येथे ३० लाख कोटी रुपयांचे करार झाल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील सर्व भाग विकास प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे सांगितले. यामुळे रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.